पीडब्ल्यूडीचा क्यूआर घोटाळा २ हजार कोटींचा!

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : सार्वजनिक बांधकाम विभागात १० लाखांच्या आतील कामांच्या निविदांमध्ये अनेक वर्षांपासून हेराफेरी सुरू आहे. जिल्हा नियोजन समितीच्या प्रशासकीय मान्यतेनंतर खासगी एजन्सींकडून या कामांच्या निविदा प्रक्रिया राबवून त्यांच्या बोगस वर्क ऑर्डर दिल्या जातात. अशाच दोन कामांचे बोगस क्यूआर कोड जिल्हा नियोजन समितीला आढळल्याने संपूर्ण यंत्रणा हरदली आहे. त्यामुळे आता मागील तीन वर्षांतील कामांचा तपास करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, तब्बल २ हजार कोटींचा हा क्यूआर घोटाळा असण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी किरकोळ ते मोठी कामे करण्यात येते. या कामांची क्रमवारी ठरविण्यात आली असून, १० लाखांच्या आतील कामांमध्येच सर्वाधिक प्रमाणात बोगसगिरी झाली आहे. प्रशासकीय मान्यता एकाच्या नावाने घेऊन त्यात दुसर्‍याच्या नावाने निविदा प्रक्रिया राबवून त्यात क्यूआर घोटाळा केला जात आहे. यात प्रामुख्याने सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दिल्या जाणार्‍या कामांचाच समावेश आहे. या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रत्येक अभियंत्याने आपापली यंत्रणा तयार केली आहे. यातील काही अधिकारी आता सेवानिवृत्त झाले आहेत. तर काहींच्या बदल्या झाल्या असून, नव्याने पदभार घेतलेले अधिकारीही या बोगस निविदा प्रक्रियेशी जुडल्या गेल्याची चर्चा आहे. दरम्यान, गेल्या महिन्यात दोन कामांचे बोगस क्यूआर कोड जिल्हा नियोजन समितीच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यानंतर हा प्रकार जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चर्चेत आला. त्यानुसार पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. चार आठवड्यांत चौकशी करून अहवाल सादर करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.